पेट्रोल चोरी धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीतील कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय

69

पुणे, दि. ८ (पीसीबी) : शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मागिल महिनाभऱात भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधील तब्बल एकविस टॅंकर ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्य़क्त केला आहे.

भारत पेट्रोलियम कंपणीबरोबरच लोणीत काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडीयन ऑईल कंपनीच्या डेपोतुनही इंधन चोरी होत असल्याचा संशय पोलिसांना असुन, पुढील आठवडाभरात वरील दोन्ही डेपोमधील टॅंकर तपासणीसाठी ताब्यात घेण्यात य़ेणार असल्याचे सुतोवाच शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले आहे. संशयित टॅंकरची माहिती गोपणीयरित्या जमा केली जात असुन, वरील दोन्ही डेपोत कोणत्य़ाही क्षणी कारवाईला सुरुवात करण्यात असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

तर दुसरीकडे हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यांच्या डेपोतून टँकर भरल्यानंतर डिलेव्हरी देण्यापूर्वी पेट्रोल -डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या चार ते पाच टोळ्या लोणी काळभोर परिसरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना असुन, या टोळ्यांच्या विरोधात कायदेशिर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या टोळ्यांना डेपोतुन रसद पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गोपनीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीतुन अनेक धक्कादायक खुलाशे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडीयन ऑईल व भारत पेट्रोलियम लिमिटेड या तीनही कंपण्यात इंधन टँकरमध्ये भरण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक स्वयंचलित मोजमाप करणारी यंत्रणा आहे. मात्र, तरीदेखील इंधन माफिया कंपणीच्या काही ठराविक लोकांना हातीशी धरून 15 लिटरच्या बादलीने सहा ते सात बादल्या अतिरिक्त टाकुन घेतात. तसेच बादलीच्या माध्यमातुन टॅंकरची इंधन टाकीदेखील फुल्ल करून घेतात. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बहुतांश टॅंकरच्या डिझेल टाकी डेपोत शिरतांना मोकळी तर बाहेर येताना मात्र टाकी फुल्ल आढळल्याचे पोलिसांना आढळुन आलेले आहे. याबाबत पोलिसांनी विविध टॅकर चालकांना विचारलेले खुलाशेच पोलिसांच्या संशयाला बळकाटी देणारे ठरले असल्याची कबुली वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने दिली आहे.

दोन अधिकारी जात्यात, तर अनेक सुपात…
भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधुन होत असलेल्या इंधन चोरीत, इंधन माफियाबरोबर भारत पेट्रोलियम कंपणीचे दोन अधिकारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याबाबतचे पुरेशे पुरावेही पोलिसांना मिळालेले आहेत. कंपणीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वारवांर बोलावुनही, अधिकारी पोलिसांच्या चौकशीपासुन दुर पळत आहेत. वरील दोन अधिकाऱ्यांनी चौकशीचा सशेमिरा लपवण्यासाठी न्यायालयातही धाव घेतलेली आहे. मात्र पोलिसांच्याकडे वरील दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याने, वरील दोन अधिकारी जात्यात, तर अनेकजण सुपात अशी परीस्थिती असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.