पुण्यातील कौटुंबिक कार्यक्रमानंतर अजितदादा अमित शाह यांच्या भेटीला…!

0
288

नवी दिल्ली,दि.११(पीसीबी) – डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचे दोन दिवसांआधी समाजमाध्यमांद्वारे जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी पुण्यातील कौटुंबिक कार्यक्रमानंतर दिल्लीत दाखल झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविनाच अजित पवार यांनी शहांची भेट घेतल्याने पुन्हा तर्कवितर्काना उधाण आले.

डेंग्यूच्या आजारातून आपण बरे होत असून, विश्रांतीसाठी दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नाही, असे अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटले होते. आजारपणामुळे अजित पवार दिवाळीसाठी बारामतीलाही गेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी कौटुंबिक कार्यक्रमामुळे पवार कुटुंबीय जमलेले होते. त्यामध्ये शरद पवार व प्रतापराव पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. या कौटुंबिक स्नेहसंमेलनात सहभागी झालेले अजित पवार खासगी विमानाने थेट दिल्लीत दाखल झाले.

अजित पवार यांनी आपले सहकारी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह ६-अ कृष्ण मेनन रोडवरील अमित शहांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांनी शहांची भेट घेतल्याचे अजित पवार गटाच्या वतीने सांगण्यात आले असले तरी, ही सदिच्छा भेट तासाभरापेक्षाही जास्त वेळ झाल्याने राज्यातील राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मुद्दय़ांसंदर्भात शहांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचे सांगितले जाते.

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असताना अजित पवार मात्र या वादापासून अलिप्त राहिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, डेंग्यूमुळे अजित पवार खरोखरच आजारी होते, हा राजकीय आजार नव्हे, असा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी कोटय़ातून मराठा आरक्षण देण्यास विरोध केला आहे. या संदर्भातही अमित शहांनी अजित पवारांशी संवाद साधला असल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने कोणीही भाष्य केलेले नाही.