पुणे हिट अँड रन प्रकरण : सामाजिक व्यवस्थेचे भयानक वास्तव; लेखन : सारंग कामतेकर

0
245

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून उद्ध्वस्त झालेले पुणे पुन्हा वैभवशाली बनवले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पुण्यातील नेत्यांनी व समाजसुधारकांनी महत्त्वाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक, महादेव गोविंद रानडे, रा.गो. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ कृष्ण गोखले, वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा राजगुरू, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई गोपाळराव जोशी, सेनापती बापट आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि समाजसुधारकांनी या शहराचे नाव देशाच्या आणि समाजाच्या हृदयावर कोरले. या थोर महापुरुष आणि स्त्रियांच्या नेतृत्वाखाली, पुणे हे एक असे शहर बनले जिथे क्रांतिकारी विचारांचा उदय झाला आणि राजकीय व सामाजिक परिवर्तनाची चळवळ प्रखरपणे उभी राहिली. या थोर व्यक्तींच्या योगदानामुळे पुणे हे केवळ एक शहर नाही तर स्वातंत्र्य आणि समतेसाठी लढणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हे शहर एक प्रेरणादायी स्थळ बनले. मात्र हिट अँड रन प्रकरणाने पुण्यातील समाजाच्या नैतिक मूल्यांबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल यांच्याशी संबंधित घटना ही आपल्या सामाजिक व्यवस्थेतील अपयशांचे प्रतिबिंब आहे. ही घटना एक शोकांतिका आहे जी श्रीमंत व बड्या लोकांना मिळणाऱ्या सवलती आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायासारख्या गंभीर विषयांवर चर्चा घडवून आणत आहे.

वेदांत अग्रवालने त्याचे १२वी इयत्तेचे शिक्षण पूर्ण करून, आपल्या मित्रांसह एका पार्टीत सहभागी झाला होता. वडिलांची आलिशान पोर्शे गाडी तुफान वेगाने चालवत असलेल्या वेदांतने दारूच्या नशेत आपल्या वाहनावरील नियंत्रण गमावले आणि त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात अनिस दुडिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनुसार हा अपघात इतका भीषण होता कि, पोर्शे गाडीची धडक बसताच दुचाकीवर बसलेली अश्विनीला हवेत फेकली गेली आणि डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी अनिसला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मात्र इतक्या भयंकर अपघातानंतर वेदांतवर जामीनपात्र कलमांखाली आरोप ठेवण्यात आले, तसेच अवघ्या २४ तासाच्या आत वेदांतला ३०० शब्दाचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला आणि त्याची जामिनावर सुटका झाली. पोलिसांनी त्याला पिझ्झा, बर्गर पुरविले व फाईव स्टार ट्रीटमेंट दिली, असे आरोप देखील झाले.

वेदांतच्या मदतीसाठी भल्या पहाटे काही राजकारणी धावत आले. राजकीय हस्तक्षेपामुळे कायदेशीर प्रक्रियेची पार ऐशी-तैशी झाली. पुण्याचे पब कल्चर, अल्पवयीनमुलांना बिनधास्तपणे दारू उपलब्ध करून देणारे बार, विना रेजीस्ट्रेशनची पोर्शे कार, घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांचा हलगर्जीपणा, ससून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा खोटेपणा, जामीनासाठी न्यायाधीशाची संशयास्पद भूमिका, वेदांतच्या ड्रायवरला डांबून ठेवणे, राजीय हस्तक्षेप, वेदांतच्या कुटुंबीयांनी त्याला वाचविण्यासाठी केलेला आटापिटा, हे सर्व काही एखाद्या चित्रपटात शोभेल असे घडत गेले. ही घटना उजेडात आणण्यात प्रसारमाध्यमं आणि त्यानंतरच्या जनक्षोभ यामुळे झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन खडबडून जागे झाले. वृत्तवाहिन्यांनी केलेले अविरत कव्हरेज आणि काही राजकीय नेते व सामाजिक संघटनांनी केलेल्या निषेध आंदोलनांमुळे अखेर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. वेदांतसह त्याचे वडील, आजोबा, आईला आणि ससून मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अटक झाली, दोन पोलिसांचे निलंबन झाले अटक झाली व आता पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

मात्र सत्ता, पैसा, स्वार्थ यापुढे नैतिकतेने गुडघेच टेकले, हे पुणेकरांसह संपूर्ण देशाने उघड्या डोळ्याने बघितले. दोन निष्पाप होतकरू युवांचा जीव हकनाक गेला याचा विसर सर्व जबाबदार व्यक्तींना पडला. बेदरकार आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्याला कायदेशीर कचाट्यातून वाचवण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी हे विसरले आहेत की, जनतेने त्यांना समाजाच्या हितासाठी प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्याला मिळालेल्या ताकदीचा गैरवापर होत आहे, याचे भान त्यांना राहिलेच नाही. अल्पवयीन मुलांना दारू पुरवून, नफ्याच्या धुंदीत डोळे मिटून बसणारे पब / बार मालक, यांना आपल्या व्यवसायिक जबाबदाऱ्यांचा पूर्णपणे विसर पडला. यामुळे भावी पिढीच्या आरोग्यावर आणि भविष्यावर गंभीर परिणाम होतो याचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. राजकीय आणि आर्थिक प्रलोभनांमुळे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी असंवेदनशीलपणा दाखवत आपल्या कर्तव्यात कसूर केले. “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे, परंतु या प्रकरणात पोलिसांनी या ब्रीदवाक्य गुंडाळून टाकल्याचे दिसून येते. ससून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांची जबाबदारी अधिक होती. एकीकडे दोन लोकांचा जीव गेला असताना रक्ताचे नमुने बदलल्याने डॉक्टरी पेश्याला त्यांनी काळीमा फसली. वेदांतचे आजोबा, वडील, आई आणि स्वत: वेदांत यांनी झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारून कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याऐवजी, त्यात गोलमाल करण्याचा एकत्रित प्रयत्न केला, जो स्वार्थाला प्राधान्य देणारा होता, परंतु त्यातून त्यांची नैतिक दिवाळखोरी दिसून आली. हे प्रकरण म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेतील दोषांचे एक भयानक वास्तवदर्शन आहे. या घटनेने हे दाखवून दिलं आहे की संपत्ती आणि राजकीय शक्तीचा दुरुपयोग कसा होऊ शकतो. सत्ता आणि पैश्याच्या धुंदीत सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे किती अधःपतन झाले आहे याचे हे ज्वलंत व बोलके उदाहरण आहे. वेदांतच्या कुटुंबाने कायदेशीर प्रक्रियेत केलेला हस्तक्षेप नैतिकतेच्या दृष्टिकोनातून निश्चितच चिंताजनक आहे. असे कृत्य आपल्या पाल्यासमोर आणि समाजासमोर एक चुकीचे आदर्श निर्माण करतो, याची त्यांना जाणीवच झालेली नसावी. मात्र पुणे हिट अँड रन प्रकरणाने समाजाला खडबडून जागे केले आहे.

या प्रकरणाचे बारकाईने विश्लेषण केल्यास, हे स्पष्ट होते की न्याय व्यवस्थेतील निःपक्षपातीपणा अत्यंत महत्वाचा घटक आहे. न्याय व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि न्यायप्रक्रियेतील निःपक्षपातीपणा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. नैतिक मूल्यांचे शिक्षण हे मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी गरजेचे आहे. विशेषतः राजकीय व प्रशासकीय जबाबदारीच्या पदांवर असलेल्या व्यक्तींनसाठी ते अत्यावश्यक आहे. जबाबदारीच्या पदांवर असलेल्या व्यक्तींनी नैतिक मूल्यांचे पालन काटेकोरपणे करत नैतिकतेचे उच्च मानक प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वांनी नैतिक मूल्यांचे पालन आणि रक्षण केले तरच समाजव्यवस्था टिकू शकेल आणि पुण्याचे नावलौकिक अबाधित राखण्यात यश मिळेल.