पुणे, पिंपरी शहरासह लगतच्या महामार्गावर आणखी इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

0
130

– महावितरणचे संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची माहिती

पुणे, दि. २२ (पीसीबी) – दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ होत असून महावितरणने देखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीला वेग दिला आहे. पुणे परिमंडल अंतर्गत सद्यस्थितीत १५ चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. यापुढे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर आणखी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील अशी माहिती महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी नुकतीच दिली.

येथील सेनापती बापट रस्त्यावरील गणेशखिंड उपविभाग कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारलेल्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन संचालक श्री. रेशमे यांच्याहस्ते नुकतेच झाले. यावेळी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी सांगितले की, राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून व ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल उपलब्ध आहे. तसेच इव्ही ग्राहकांसाठी पॉवर अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपमध्ये चार्जिंग स्टेशन्सचे लोकेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, वापरलेले वीज युनिट, पेमेंटसाठी वॉलेट व बॅलन्स आदींची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे.

पुणे परिमंडलामध्ये सद्यस्थितीत १५ उपकेंद्राच्या ठिकाणी महावितरणकडून इव्ही चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये संघवीनगर (औंध), रिजन्सी इन्फ्रा (ननावरे वस्ती, औंध), गणेशखिंड उपविभाग कार्यालय परिसर (सेनापती बापट रस्ता), अमर पॅरॅडिगम (बाणेर), बेंचमार्क उपकेंद्र (पुनावळे, मुंबई हायवे), प्राधीकरण स्विचिंग स्टेशन (पुनावळे मुंबई-पुणे हायवे), सीआयआरटी उपकेंद्र (कासरवाडी, पुणे-नाशिक हायवे), कुणाल आयकॉन स्विचिंग स्टेशन (पिंपळे सौदागर), सेक्टर १० स्विचिंग स्टेशन (भोसरी), सीडीसी स्विचिंग स्टेशन (स्पाईन रोड, शाहूनगर), ब्रम्हा सनसिटी (वडगाव शेरी), झेन्सार स्विचिंग स्टेशन (खराडी), कीर्ति कॅसल स्विचिंग स्टेशन (वडगाव शिंदे, लोहगाव), रेसकोर्स उपकेंद्र (रेस कोर्स), राजगुरुनगर उपकेंद्र (कडूस फाटा, चांडोळी, ता. खेड) येथील चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे.

कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता सर्वश्री शंकर तायडे, सतीश राजदीप, युवराज जरग, अरविंद बुलबुले, प्रवीण पंचमुख, डॉ. सुरेश वानखेडे आदींसह अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.