दि . १७ ( पीसीबी ) – तब्बल 117 टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे 20 टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवू लागले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा
यांनी केला आहे. उजनी धरण परिसरात पाहणी केल्यानंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास 20 पीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने यामुळे धरणातील सर्व 117 टीएमसी पाणी विषारी बनत आहे. या विषारी पाण्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले आहे.
राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात फिरून पाहणी केल्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण आता मोकळे होऊ लागले आहे. या ठिकाणी जमिनीवर जे पांढऱ्या रंगाचे आवरण दिसत आहे. ते सर्व उद्योगातून येणाऱ्या विषारी रसायनाचे असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. अशावेळी विकासाच्या गोष्टी करताना पुणे आणि पिंपरी चिंचवड याला एक न्याय व उजनी धरणाखाली असलेल्या शहरांना दुसरा न्याय असे करणे योग्य आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना तीन पैशाला एक हजार लिटर पिण्यायोग्य पाणी मिळते. हे पाणी खराब करून उजनी धरणात येत असल्याने उजनी धरणाच्या खालच्या नागरिकांना मात्र 20 रुपयाला वीस लिटर पाणी विकत घ्यावे लागते. ही बाब निदर्शनास आणली. उजनीचे पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडसह धरणाच्या वरील भागातून येणाऱ्या 20 टीएमसी पाण्यामुळे विषारी होते आणि हे पाणी धरणा खालच्या लोकांना पिण्यायोग्य रहात नाही. त्यामुळेच त्यांना एक रुपया लिटर प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते, हा कोणता न्याय असा सवाल डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन उजनी धरण प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असे आवाहन केले आहे. हा विकास नसून विनाश असून प्रशासन मात्र यात कमी पडत असल्याचे मत रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी व्यक्त केले. दिवसेंदिवस उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणात वाढ होत असून हे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी आता सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन तरुण, पाणलोट क्षेत्रातील शेतकरी वर्ग पुढे येणे गरजेचे असल्याचे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी सांगितले.
मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पाणी जीवन आहे हे मी शिकलोय. राजस्थानमध्ये लोकांचा इलाज करताना त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुझे उपचार, औषध नको आम्हाला पाणी हवंय. स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतर पाण्याबाबतीत परिस्थिती सुधारली नाही उलट ही परिस्थिती प्रचंड बिघडली आहे. लोकप्रतिनिधिनी पाण्यासंदर्भात आवाज उठवणं, प्रश्न विचारण बंद केलंय. उजनीबाबतीत इथले लोकप्रतिनिधी किमान विधानसभेत प्रश्न तरी विचारायला हवं होते.
उजनीची स्थिती दिवसेंदिवस बिघडत जातेय, आधी इथे कॅन्सर रुग्ण असल्याचे आमच्या ऐकण्यात नव्हते. पण आता उजनीच्या शेजारी कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याचे ऐकण्यात येतंय. भिगवणमध्ये आम्ही काल सभा घेतली तिथं लोकांनी सांगितलं प्रत्येक गावात कॅन्सरचे रुग्ण आहेत. उजनी धरण आता ICU मध्ये भरती आहे, इंडस्ट्रिअल भागातून जाणारे पाणी हेच त्याला कारण आहे. पाणी दूषित राहिल्याने उजनीतील जलचर मरत आहेत, उजनीतील पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले.
नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क, सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय योग्य: राजेंद्र सिंह
सिंधू कराराच्या बाबतीत जो निर्णय केंद्र सरकारने घेतला मी त्याचे स्वागत करतो, योग्य वेळी सरकारने हा निर्णय घेतला. कुठलाही करार 30 वर्षानंतर रिविव्ह केलं पाहिजे, 60 वर्ष झाले तरी अजून त्याबद्दल रिविव्ह झालेलं नाही. 80 टक्के पाण्यावर भारताचा हक्क आहे, 7 नद्या हे पाणी पाकिस्तानमध्ये नेत आहेत. ह्या करारबाबतीत सुधारणा करून पाणी आपल्याकडे राखून ठेवलं पाहिजे, असे मतही राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.