पीएमपीएमएल बस प्रवासात दागिने चोरीला

38

निगडी, दि. ३ (पीसीबी) – स्वारगेट ते निगडी दरम्यान पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेच्या बॅगेतून चार लाख 60 हजारांचे दागिने चोरीला गेले. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली.

याप्रकरणी प्रवासी महिलेने (वय 27) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी बारा ते दीड वाजताच्या कालावधीत स्वारगेट ते निगडी या मार्गावर पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांचा पाच तोळ्याचा सोन्याचा राणीहार, एक लाख 20 हजारांचे तीन तोळ्याचे नेकलेस, 80 हजारांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र, 60 हजारांचे दीड टोळ्यांचे कंगन असे एकूण चार लाख 60 हजारांचे दागिने नकळत चोरून नेले. फिर्यादी महिला दुपारी दीड वाजता भक्ती शक्ती चौक येथे उतरल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.