पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
552

हिंजवडी, दि.२४ (पीसीबी) – बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पाच वाजता मारुंजी येथे करण्यात आली.

रविकिरण हनुमंत भोसले (वय 24, रा. मारुंजी, पुणे), अमित सुभाष साळुंखे (वय 20, रा. धानोरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना शस्त्र देणाऱ्या नयन बोंबाळे (रा. चाकण) याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अंमलदार गोविंद चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथे एक्झर्बिया सोसायटी जवळ दोघेजण पिस्टल घेऊन आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन रविकिरण भोसले आणि अमित साळुंखे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 50 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक हजारांचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपींना चाकण येथील नयन बोंबाळे याने पिस्टल दिले असल्याचे तपासात समोर आल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.