- गुणवत्तापूर्ण सेवांच्या जोरावर पिंपरी चिंचवड महापालिकेची राज्यात उत्तम कामगिरी
पिंपरी, दि. १ ( पीसीबी ) – मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ने महापालिका श्रेणीत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे स्थान पटकावले आहे. गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India – QCI) घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५. ७१ गुण मिळाले असून, उल्हासनगर महापालिका अवघ्या काही गुणांनी (८६. २९) प्रथम क्रमांकावर राहिली.
महानगरपालिकेची ही कामगिरी म्हणजे राज्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा व नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.
मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखड्यात राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. अंतिम टप्प्यात क्यू सी आय ने कार्यालयांचे संकेतस्थळ सुलभता, कार्यालयीन पायाभूत सुविधा, तक्रार निवारण यंत्रणा, रहिवास सुलभता, गुंतवणूक प्रवर्धन व तंत्रज्ञान समावेश अशा १० महत्त्वाच्या निकषांवर मूल्यमापन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निकाल जाहीर करताना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “या सर्वांच्या प्रभावी व कल्पक अंमलबजावणीमुळे राज्य प्रशासन अधिक नागरिकाभिमुख, कार्यक्षम व आधुनिक बनत आहे,” असेही ते म्हणाले.
या सर्व उपक्रमांमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कामगिरी कार्यक्रमाच्या मध्यकालीन आढाव्यात सर्वोत्तम ठरली होती आणि अंतिम मूल्यांकनातही ती सिद्ध झाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीत खालील उपक्रमांचा समावेश होता:
१) सर्वांसाठी सुलभ व रिअल-टाईम माहिती देणारी संकेतस्थळ
२) एआय आधारित तक्रार निवारण यंत्रणा
३) जीआयएस आधारित मालमत्ता कर सुधारणा
४) स्मार्ट सेवा सुविधा
५) स्वच्छतेला प्राधान्य
६) नागरी सेवा प्रतिसाद वेळ सुधारण्यासाठी अंदाजाधारित विश्लेषण प्रणाली
मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात मिळालेलं यश
आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील सर्वोत्तम महापालिकांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला याचा आनंद वाटतोय. हे यश मिळाल्यामुळे सर्वअधिकारी ,कर्मचारी,लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. हे यश म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी सर्वानी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ.