माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

0
289

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक आणि भोसरीतील भाजपच्या नगरसेविका प्रियांका प्रविण बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला.यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे,माजी मंत्री आमदर जितेंद्र आव्हाड,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,युवक शहराध्यक्ष इम्रान शेख कार्याध्यक्ष सागर तापकीर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश घेण्यात आला. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विनायक रणसुंभे यांनीही अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बाजी मारली.या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ खासदार निवडून आणत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. तसेच शिरूर लोकसभेत डॉ अमोल कोल्हे यांना मिळालेल्या जनसामान्याचे कौल लक्षात घेत पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या दिशेने जाण्याचे संकेत आता मिळू लागले आहे.भोसरीतील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उच्चशिक्षित भाजप नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड शहरात तुतारी जोरात वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून प्रवेश – बारसे

यावेळी बोलताना प्रियांका बारसे म्हणाल्या” भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला कंटाळून तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. भाजपमधील अजून सहकारी आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. येणाऱ्या काळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वात तसेच युवकअध्यक्ष इम्रान शेख आणि सहकारी यांच्या सोबतीने पिंपरी चिंचवड शहरात जोमाने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी रजनीकांत गायकवाड,शाहिद शेख,अशरफ शेख,फहिम शेख, मेघराज लोखंडे,समाधान अचलखांब,प्रवीण बारसे तसेच सुहास देशमुख,प्रथमेश बारसे,कान्होपात्रा थोरात,वैशाली पडवळ आधी युवक आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजपच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपच्या नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला.आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेला प्रभावीत होऊन प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला असून लोकसभा निकालाच्या आधी पासून त्या जयंत पाटील साहेब यांच्या संपर्कात होत्या. येत्या काही दिवसात इतर पक्षातील पाच नगरसेवक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असेही ते म्हणाले.