पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी, शहरासाठी दहा टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री सकारात्मक

0
95

वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, हिंजवडी परिसरातील पाणी समस्या सुटणार- खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता मुळशी धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित केले जाणार आहे. शहरासाठी दहा टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे झपाट्याने वाढणा-या वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, पिंपळेसौदागरसह नव्याने समाविष्ट होणा-या सात गावांचा पाणी प्रश्न सुटरणार आहे. आयटीनगरी हिंजवडीला मुबलक पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. शहराचा सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर,विकासाचा वेग आणि भविष्यातील सन 2041 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेऊन मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आणावे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी सद्यस्थितीत पवना धरणातून 185.67 द.ल.घ.मी, आंद्रा धरणातून 36.87 द.ल.घ.मी. व भामा धरणातून 60.79 असा एकूण 283.33 द.ल.घ.मी. एवढा वार्षिक पाणीसाठा उपलब्ध आहे. शहराचा सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग व भविष्यातील सन 2041 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेता, शहरासाठी आणखी पाणी उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे. यासाठी पुणे विभागात असणारे मूळशी धरणातून 10 टीएमसी पाणी आरक्षित करुन पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करुन देणे शक्य आहे. याकामी सर्व संबंधित विभागांना सूचना द्याव्यात. पिंपरी-चिंचवड शहरासाठी 10 टीएमसी पाणी उपलब्ध झाल्यास शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल.

मुळशी धरण 24 टीएमसीचे आहे. 10 टीएमसी पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला मिळावा. मुळशी धरणातून पाणी मिळाल्यास शहरात समाविष्ट होणा-या सात गावांचा तसेच झपाट्याने विस्तारात असलेल्या वाकड, ताथवडे, थेरगाव, पिंपळेनिलख या वाढत्या परिसराला मोठा पाणीसाठा उपलब्ध होईल. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल. आयटी क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महापालिकेसाठी दहा टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याबाबत संबंधित अधि-यांशी चर्चा करतो. त्यांना तशा सूचना दिल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.