पिंपरी चिंचवडकरांनो “व्यक्त व्हा”

0
153

पुणे आणि नागपूर मधील हिट एन्ड रन मध्ये निष्पाप पाच जणांचा बळी, बेकायदा होर्डिंग कोसळून १४ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू आदी घटनांचा मागोवा घेत सर्व थरातील नागरिकांनी व्यक्त व्हायला पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आयटी अभियंता अमित तलाठी यांनी केले आहे. व्यक्त होण्यासाठी सर्वांनी उद्या रविवारी, दिनांक २६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता चापेकर चौक, चिंचवड इथे मोठ्या संख्येत जमावे, असे आवाहन सोशल मीडियातून केले आहे.

आपल्या निवेदनात तलाठी विविध घटनांचा संदर्भ देतात. ते म्हणतात,

घटना क्र १.
मुंबईतील उपनगर घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग पडून १४ पेक्षा जास्त नागरिकांचा करुण अंत.

घटना क्र २.
पुण्यात साडे १७ वर्षाच्या अतिश्रीमंत कुटुंबातील युवकाने दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोन जणांना यमसदनी पाठवले…. या युवकावर कठोर कारवाई होऊ नये म्हणून रात्रौ ३ वाजता स्वतः आमदार पोलीस चौकीत हजर झाले असा प्रत्यक्षदर्शींनी दावा आहे.या युवकाला पोलिसांनी पिझ्झा, बर्गर पोहचविले, २४ तासाच्या आत या युवकाला ३०० शब्दाचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला….

घटना क्र ३.
डोंबिवली MIDC इथे एका कंपनीतील “अनधिकृत” बसविलेल्या बॉयलरच्या स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू

घटना क्र ४.
नागपूर इथे मद्यधुंद तरुणाने ३ जणांना बेदरकारपणे चारचाकीखाली चिरडले

सध्या महाराष्ट्रात अश्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अश्या घटना घडल्या कि न्युज चॅनेलवाले नवीन बातमी मिळेपर्यंत अश्या बातम्या दाखवितात, जनता तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त करते, प्रकरण गरम असेपर्यंत पोलीस कारवाई चालू राहते, काही काळापुरती महानगरपालिका जुजबी योजना करते, नेते सोशल मीडियावर दुखवटा व्यक्त करतात. आणि काही काळाने सर्व काही जैसे थे होते. परिस्थिती ढिम्म बदलत नाही.

हे कुठपर्यंत चालू राहणार ? आपण अश्या घटना आपल्याबरोबर घडण्याची वाट पाहायची का ? पिंपरी चिंचवडकरांना नक्की काय वाटते ? पिंपरी चिंचवडमधील जनतेचे अश्या घटनांवर काय मत आहे? राजकीय नेते, पोलीस,पत्रकार बंधू, महानगरपालिका यांच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत? पिंपरी चिंचवडकरांना, पिंपरी चिंचवड/महाराष्ट्रात काय बदल अपेक्षित आहे? त्या आम्हाला जाणून घेण्याची ईच्छा आहे.

चला तर मग आपण व्यक्त होऊयात…. तुमच्या मनातील खदखद व्यक्त करा…. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहचू द्या …. आम्हाला आशा आहे कि आपण सर्वजण एकत्र आलो तर पिंपरी चिंचवडमध्ये/महाराष्ट्रात बदल घडवू शकू ….आपण सुरुवात आपल्या पिंपरी चिंचवडपासून करूयात.

तुमच्यातलाच एक पिंपरी चिंचवडकर …