पिंपरी चिंचवडकरांना अविनाश-विश्वजित यांचा सांगीतिक प्रवास अनुभवण्याची संधी

0
44

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) : सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजित या जोडीचा सांगीतिक प्रवास अनुभवण्याची संधी पिंपरी चिंचवडकरांना मिळणार आहे. आलाप अँड आराध्य एंटरटेनमेंट प्रेझेंट्स आणि प्रशांत साळवी, सुधीर खोत यांच्या वतीने शनिवारी (दि. 21 सप्टेंबर) सायंकाळी सात वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हा संगीत काँन्सर्ट होणार आहे. संगीतकार अविनाश चंद्रचूड यांनी याबाबत माहिती दिली.

अविनाश-विश्वजित या जोडीची 15 वर्षांची साथ आहे. दोघेही मूळचे पुण्याचे असून सुरुवातीपासूनचा प्रवास या काँन्सर्टमध्ये प्रेक्षकांना अनुभवता येईल. या जोडीला एक डाव धोबी पछाड पहिला चित्रपट मिळाला. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट आला आणि तिथून अविनाश-विश्वजित ही जोडी चर्चेत आली. हृदयात वाजे समथिंग, ओल्या सांज वेळी, विठ्ठला विठ्ठला अशी अनेक हिट गाणी या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीला दिली आहेत.

पंचमदा यांच्या बरोबर देखील या जोडीने काम केले. अनेक नवीन पैलू या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहोत. कार्यक्रमात रोहित राऊत, रवींद्र खोमणे, ऋषिकेश रानडे, लारिसा अल्मेडा हे गायक या कार्यक्रमात गाणी गातील.

अविनाश चंद्रचूड म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रेक्षक तयार होत आहे. पूर्वी लोकसंगीत प्रधान कार्यक्रम शहरात व्हायचे. आता ट्रेण्ड बदलत आहे. प्रेक्षक चोखंदळ होत आहे. अनेक नवनवीन विषयाचे प्रेक्षक इथे तयार होत आहेत. त्याविषयी कार्यक्रम देखील चांगल्या प्रकारे इथे सादर होत आहेत. पिंपरी चिंचवड करायसाठी हा नवीन कार्यक्रम घेऊन येताना आनंद होत आहे.”