पाच वर्षे कोठे हातात, आता प्रचाराला वेळ मिळाला …

0
195
  • अमोल कोल्हे यांच्या विरोधात मतदार संघात बॅनर

लोकसभा निवडणुकीचा प्रचारात रंगत आणली आहे. आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे. मतदार आता जागृत झाले असल्याचा हा परिणाम आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर झळकले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली शिरूर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीत पुन्हा आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात करून दिली आहे. मात्र गेल्या पाच वर्षात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मतदारसंघात येत आहेत, अशी नाराजी आता लोकसभा मतदारसंघात नागरिकांकडून दिसू लागली आहे.

खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचा जनतेशी पाहिजे तसा जनसंपर्क राहिलेला नाही. आता अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार दौरा केला. या वेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात बोलके पोस्टर लागलेले पाहावयास मिळाले. त्यात विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता ? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असे तीन मोजके पण मार्मिक प्रश्न विचारण्यात आले आहे. खासदार साहेब उत्तर द्या, एक सुज्ञ नागरिक असे त्या बॅनरवर म्हटले आहे.