पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांच्या वसूलीची मोहीम वेगात, शनिवारी, रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

0
82

पुणे, दि. २३ (पीसीबी) : पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख ८ हजार वीजग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी असल्याने वसूली मोहिमेला वेग देत वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २४) व रविवारी (दि. २५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १६६ कोटी ७१ लाख रुपये (६,९८,५८६), सातारा १५ कोटी ७४ लाख (१,५१,८७८), सोलापूर- ३६ कोटी ५ लाख (२,१२,९६०), सांगली- १६ कोटी १३ लाख (१,५८,८९०) आणि कोल्हापूर जिल्ह्यात १८ कोटी ६७ लाख रुपयांची (१,८६,०६२) थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीजजोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.