पद म्हणजे काय ? ? – विलास लांडे पाटील यांची पोस्ट चर्चेत

0
421

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली, त्या पायरीला कधीच विसरू नये…

पिंपरी चिंचवड शहराचे सर्वात तरूण महापौर तसेच जुन्या हवेली तालुक्याचे आणि नंतर भोसरीचे प्रथम आमदार होण्याचा मान ज्यांना मिळाला ते मुरब्बी राजकारणी म्हणून विलास लांडे यांचा परिचय आहे. तीस वर्षे शहरात राजकारण करणारे विलासशेठ हे तीन हजार लोकांना रोजगार देणाऱ्या ऑटो लाईन या देश विदेशात कार्यालये असलेल्या कंपनीचे मालक आहेत. अत्यंत महत्वाकांक्षी विलासशेठ तथा काका यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारीसाठी इच्छुक होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना तिथे संधी मिळाल्याने लांडे पाटलांनी आपले दिल्लीचे स्वप्न पेटीत बंद केले आणि अगदी प्रवचनकाराच्या मूडमध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. पद म्हणजे काय, या एका शब्दावर माजी आमदार लांडे पाटील यांनी जे विचारमंथन केले ते त्यांच्याच शब्दांत देत आहोत.

आपल्या पोस्टमध्ये विलास लांडे पाटील म्हणतात, कोणतेही पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो. कोणत्याही माणसाचे महत्व हे “पद” मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तर तो त्या “पदाला” किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते.

कर्तृत्वच नसेल आणि “पद” मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो.”पदामुळे” तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते, “पदामुळे” आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे. चांगली माणसं, सहकारी बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे.
व्यक्ती जेंव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती निव्वळ त्याच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेला त्यागाचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठं म्हणण्या पेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात याची जाणीव ठेऊन वागलेली बरं. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो…!

लक्षात असू द्या “पद” क्षणभंगुर असते, पण “पद” गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे, असे माणसांशी वागले पाहिजे!, नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तृत्व, वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो, ऐकत असतो आणि सहनही करत असतो, मात्र लबाडीपणा वाढला तर योग्य वेळी धडा शिकवतो ? की तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा, नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिध्द करा, तरच लोक तुमच्या सोबत राहतील…!

जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो, जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे. जो “पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने “पद” आहे म्हणूनच काम केलं पाहिजे असे नाही, “पद” हे आपण मागून नाहीतर आपल्या लोकांनी, समाजानी दिल पाहिजे तरच त्या कर्तुत्वाला मानसन्मान मिळतो. “पद” म्हणजे मी कुणी मोठा आहे हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उतरती कळा सुरू झाली हे समजून जा. कारण गर्वच तेवढा झालेला असतो.