पंधरा तोळ्यांची सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक

0
469

चाकण, दि. ४ (पीसीबी) – मारहाण करून गळयातील 15 तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तीन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली. चोरांकडून सोनसाखळीसह तीन लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

श्रीराम संतोष होले (वय 25, रा. होलेवाडी ता. खेड), प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय 21, रा. टाकळकरवाडी ता. खेड), बबलु रमेश टोपे (वय 23, रा. वाकी बु ता खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सतीष कुंडलीक गव्हाणे (वय 57, रा. पाटीलवाडी कोरेगाव भिमा ता शिरूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बहुळ गावच्या हददीत चाकण शिकापुर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने मारहाण केली. फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील 15 तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरून चोरटे दुचाकी वरून पळून गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चाकण पोलिसांनी खेड तालुक्यातून तिघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून सोन्याची साखळी तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा तीन लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर चोरी, जबरीचोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.