पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय

0
50

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर भारत जगात शक्तिशाली बनेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यावेळी मधुकर चव्हाण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय.

सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय, असं आवाहनही मधुकर चव्हाण यांनी केलंय.

गुहागर मधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते मधुकर चव्हाण यांची शरद पवार आणि उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. अनंत गीते तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करताय? तुमचे नेतृत्व उध्दव ठाकरे हे लाचार आहेत, अशी टीका मधुकर चव्हाण यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उध्दव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकला, असंही मधुकर चव्हाण यांनी म्हटलं आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबरोबरच मधुकर चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाना साधलाय. देशाचे संविधान लिहणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरात प्रकाश आंबेडकर यांच्या रूपात काजवा जन्माला आला, अशी घणाघाती टीका मधुकर चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलीये. शरद पवार यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच असल्याचा आरोप मधुकर चव्हाण यांनी केला आहे. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का? असा सवालही मधुकर चव्हाण यांनी केलाय.