नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मंत्री मुश्रिफ यांची मागणी, उत्तीर्ण विद्यार्थी धास्तावले

0
90

नीट-यूजीच्या सदोष निकालामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थी-पालकांना दिलासा देण्याऐवजी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यार्थी-पालकांच्या अस्वस्थतेत भर घातली आहे. दुसरीकडे, न्यायालयाने हस्तक्षेप करून नीट परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाययोजनेसाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी उच्च शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वीच केली केली आहे. या गोंधळाबाबत मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता, ‘‘तूर्तास तरी पालकांच्या तक्रारीवरून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आणि केंद्र सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे,’’ अशी माहिती त्यांनी दिली.

नीट-यूजीच्या सदोष निकालांवरून देशस्तरावर विद्यार्थी-पालकांकडून रोष व्यक्त होत आहे. या निकालामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या नीट-यूजीच्या रँकमध्ये ३० ते ४० हजाराचा फरक पडल्याची तक्रार आहे. मात्र नीट घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) NTA या केंद्रीय यंत्रणेकडून याची दखल घेतली न गेल्याने ५० ते ६० हतबल विद्यार्थी-पालकांनी मागील आठवड्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

या प्रकरणी ‘सीविक मिरर’ने हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पालकांच्या तक्रारी केंद्र सरकार आणि एनटीएपर्यंत पोहोचविल्याची माहिती दिली. आपण फेरपरीक्षेची मागणी केली आहे का, असे विचारले असता ‘‘या प्रकाराची आधी चौकशी करावी लागेल. पालक म्हणतात त्याप्रमाणे गैरप्रकार झाला आहे का, हे तपासावे लागेल. त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवावी लागेल,’’ असे उत्तर मुश्रीफ यांनी दिले.

ग्रेस गुणांमुळे कटऑफ वाढला असून याचा परिणाम राज्यातील वैद्यकीय प्रवेशांवर होणार आहे. त्यामुळे नीट-यूजीच्या निकालाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, ग्रेस मार्क रद्द करून सुधारित निकाल जाहीर करण्यात यावा. तोपर्यंत राज्यातील प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन पालकांकडून मंत्र्यांना देण्यात आले. यात नीट-यूजीच्या फेरपरीक्षेचा अजिबातही उल्लेख नव्हता. तरीही पालकांचे म्हणणे समजून न घेता प्रसारमाध्यमांना बाईट देताना ही परीक्षाच पुन्हा घेण्याची मागणी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्र सरकारकडे करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटल्याने पालकांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे.

‘‘मागील आठवड्यात शुक्रवारी (दि. ७) आम्ही राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना भेटलो. मंत्र्यांनी आम्हाला अवघी १० मिनिटे दिली. बाहेर येऊन मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पाहता, त्यांना आमचे म्हणणे त्यांना कितपत समजले असावे, याबाबत शंकाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांची भेट घेणाऱ्या पालकांच्या शिष्टमंडळातील एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. फेरपरीक्षेची मागणी आम्ही केलेलीच नसताना मंत्र्यांनी ते जाहीरपणे सांगितल्याने पालकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण झाला आहे. आता हायकोर्टाशिवाय आमच्या विद्यार्थ्यांना कुणीही वाली उरलेला नाही, अशा शब्दांत आणखी एका पालकाने हतबलता व्यक्त केली.

डीपर इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि हायर एज्युकेशन कन्सल्टंट हरीष बुटले म्हणाले, ‘‘नीट परीक्षेमध्ये बदल करण्याची गरज आहे. बारावीच्या निकालानंतर नीट घेतली जावी. अमर्यादित ऐवजी केवळ तीन वेळा नीट देण्याचे बंधन असावे. अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी उच्च असावी. पर्सेंटाईल आणि ग्रेस मार्कासाठी फॉर्म्युला असावा. नीट परीक्षेच्या निकालात निगेटिव्ह मार्किंगदेखील बदलले पाहिजे. आता जो निकालाचा गोंधळ झाला त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. पेपर लीक झाल्यामुळे ही नीट रद्द करावी अशी मागणी आहे. न्यायालयाने हस्तक्षेप करून नीट परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी ठोस उपाय करण्यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे.’’