निवडणुकीत मतदाराना ‘पाकिट’ वाटप करावेच लागते

0
208

वैजापुर, दि. २० (पीसीबी) : हाथ जोडून रडल्याने सहानभूती मिळते मतदान मिळत नाही, निवडणुकीत मतदाराना ‘पाकिट’ वाटप करावेच लागते.तेव्हा निवडणूक जिंकली जाते. ‘माझे कुटुंब-तुमची जबाबदारी’ अशा पध्दतीने उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्रीपद उपभोगून कारभार महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न कशी समजणार, अशा शब्दांत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरेवर टीकास्र सोडले.

वैजापूर येथे आठ कोटी ९४ लाख रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या तहसिल कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या शनिवारी ( ता.२०) भुमीपुजनच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, माजी सभापती हरिभाऊ बागडे, आमदार रमेश बोरणारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे,पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया,तहसीलदार राहुल गायकवाड, व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री विखे म्हणाले, पाणंद रस्त्यांची कामे रेंगाळल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालची वाहतुक करण्यासाठी अडचण येत आहे.‌ यापुढील काळात सर्व पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करुन त्यांना क्रमांक देण्यात येईल जेणेकरुन या रस्त्यांचे कायमस्वरुपी अस्तित्व राहील. त्यासाठी साठ ते सत्तर हजार कोटी रुपयांचा आराखडा विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. वैजापुरच्या तहसिल इमारतीचे एक वर्षात लोकार्पण करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली.

वाळु माफियांना वठणीवर आणु…
वाळु तस्करीला लगाम घालुन परवडेल अशा दरात वाळु उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने वाळु डेपोच्या माध्यमातुन सहाशे रुपये प्रति ब्रास या दराने वाळु देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करतांना वाळु तस्कर व त्यांना साथ देणारे प्रशासनातीलच काही अधिकारी आडकाठी करुन डेपो बंद करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. मात्र, सरकार कोणत्याही परिस्थितीत त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. मोक्कासारखे कायदे लावुन त्यांना वठणीवर आणु असा सज्ज्ड दम विखे पाटिल यांनी दिला.