नातवांना भेटण्यासाठी आजीकडे मागितली दीड कोटींची खंडणी

291

तळेगाव दाभाडे, दि. २६ (पीसीबी) – नातवंडांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला भावाने दीड कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची बहिणीला धमकी दिली. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी डी पी रोड, तळेगाव दाभाडे येथे घडली.

सुरेश पांडुरंग शिंदे, एक महिला (रा. शास्त्रीनगर, धारावी, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आजीने शनिवारी (दि. 25) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाचा विवाह फिर्यादीच्या लहान भावाच्या मुलीसोबत झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुलांना घेऊन फिर्यादी यांची सून सध्या वडिलांकडे राहते. त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी फिर्यादी त्यांच्या नातवांना भेटण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांच्या भावाने नातवांना भेटायचे असेल आणि त्यांना पुन्हा आपल्या घरी न्यायचे असेल तर दीड कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी मागितली. पैसे न दिल्यास धारावीची पोरं आणून तुला मारून टाकतो, अशी भावाने बहिण फिर्यादी यांना धमकी दिली. फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.