नशेत असताना तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणीच्या मानलेल्या भावाने केला खून

0
279

मानलेली बहीण नशेत असताना सहकाऱ्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून सहकाऱ्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) भूमकर वस्ती, वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली.

निकेतकुणाल विजयकुमार सिंह (वय 28, रा. भुजबळवस्ती, वाकड) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (वय 28, रा. दत्त मंदिर रोड, वाकड, मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल यांनी बुधवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मानलेली बहीण आणि मृत निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते. दरम्यान, 3 एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र आले. आरोपीच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. त्यावेळी निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणीने तिचा मानलेला भाऊ आरोपी लोकेंद्र किशोरसिंह याला माहिती दिली.

याबाबत जाब विचारण्यासाठी लोकेंद्र हा त्याच्या शर्टमध्ये वीट घेऊन निकेतकुणाल याला मारण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी लोकेंद्र याने सोबत आणलेली वीट निकेतकुणाल याच्या डोक्यात घातली. यामध्ये जखमी झालेल्या निकेतकुणाल याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, रात्री झोपेत त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

या घटनेनंतर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल व आपली बदनामी होईल, अशी भिती निकेतकुणालच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे रुग्णालयातून घरी आल्यानंतर निकेतकुणाल याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्याभोवती व्रण देखील दिसत होते. त्यानुसार, पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद घेतली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात निकेतकुणाल याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.