नवनाथ जगताप यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
59

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती, पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आमदार रोहित पवार यांनी पक्षाची मफलर आणि पुष्पुगुच्छ देऊन जगताप यांचा सत्कार केला.
पक्षाच्या कार्यक्रमात जगताप यांच्यासह मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुण पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून प्रवेश केला. जगताप आणि पवार यांच्या शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
चिंचवड विधानसभा निवडणुकित जगताप यांच्या पक्षांतरामुळे खळबळ आहे. पिंपळे गुरव येथून सलग दोन टर्म नगरसेवक झालेले नवनाथ जगताप यांचा परिसरात दबदबा आहे. जगताप हे पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारात अधिकृतपणे सहभागी होणार आहेत, पिंपळे गुरव परिसरात जगताप यांचे वर्चस्व कायम असून १५ हजार कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या बरोबर कायम असते. त्यामुळेच जगताप यांचा पक्ष प्रवेश महत्वाचा समजला जातो. कलाटे यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.