नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, गुदमरल्याने जेष्ठ महिलेचा मृत्यू

251

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुणे नगर रस्त्यावर दुर्दैवी घटना समोर आली आहे. वडगाव शेरी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, ही वाहतुक कोंडी ६२ वर्षीय महिलेच्या जीवावर बेतली. कुटुंबीयांसोबत उपचारासाठी जाताना वाहतूक कोंडीमध्ये वाट न मिळाल्याने महिलेला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे, कारमध्ये गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे-अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री टँकर पलटी झाल्याने मोठा अपघात झाला होता. अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. घटनेची माहिती मिळताच मिळताच अग्निशमन दलाकडून वायुगळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात आले. तर पोलिस विभागाकडून वाहतूक नियंत्रित करण्यात येत होती.

परंतू, रस्त्याच्या मधोमध टँकर पलटी होऊन रस्त्यावर ज्वलनशील पदार्थ सांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाने वाहतूक वळण्याचे काम सुरू होते. मात्र, सकाळी कार्यालयाची वेळ असल्याने नगर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान, एक ६२ वर्षीय आजारी महिला उपचारासाठी कुटुंबीयांसोबत कारमधून रुग्णालयात जात होती. परंतू, वाहतूक कोंडी त्यांच्या कारला रस्ता मिळाला नाही. त्यामुळे, महिलेला वेळेवर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत मिळू शकली नसल्याने कारमध्येच गुदमरून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. वेळेवर महिलेला वाट मिळाली असती, वेळेवर उपचार मिळाले असते तर कदाचित महिलेचा जीव वाचला असता. मात्र, दुर्दैवाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त कऱण्यात येत आहे.