नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

0
202

– संपूर्ण देश तुझ्यासोबत, पंतप्रधानांनी दिले आशिर्वाद, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने झाली भेट

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, चिंचवडमधील २७ वर्षीचा उच्चशिक्षित तरुणी रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन जगभर घडविणार आहे. मतदारसंघातील असल्याने तिला मी पूर्णपणे सहकार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून पुढील प्रवास करण्याची विनंती रमाबाईने माझ्याकडे केली होती. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे वेळ मागितली. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि आज भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली.

याबाबतची माहिती देताना रमाबाई म्हणाल्या, सहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. भारत की बेटी म्हणून मी दुचाकीवरुन जगभ्रमंती करत आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. त्यामुळे पूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. ८ मार्च २०२४ रोजी मी भारतात परत येणार आहे. मुंबईतील इंडिया गेट येथून ९ मार्चपासून प्रवासाला सुरुवात केली. तेथून १८०० किलोमीटरचे अंतर कापून आज दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. जगभ्रमंतीसाठी खासदार बारणे यांचे सहकार्य मिळत आहे.