धुळ्याहून गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; साडेआठ किलो गांजा जप्त

0
238

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – धुळे येथून पिंपरी चिंचवड शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून सुमारे साडेआठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

बाईला अनसिंग किराडे (वय 40, रा. धुळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पठाण डोंगरसिंग बामणे (रा. धुळे) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील वल्लभनगर बस स्थानकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वल्लभनगर बस स्थानक परिसरात सापळा लावून बाईला यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेत त्याच्याकडून चार लाख 29 हजार 450 रुपये किमतीचा आठ किलो 569 ग्रॅम गांजा आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा त्याचा साथीदार डोंगरसिंग याच्याकडून आणला असल्याचे तपासात उघडकीस आल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.