धक्कादायक! प्रियकराला प्रेयसी आणि तिच्या मित्राने दगडाने ठेचले

0
89

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) चिखली, – पतीला सोडून माझ्याजवळ राहण्यासाठी ये, असा तगादा लावल्याने प्रेयसीने मित्रासोबत मिळून प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला. प्रेयसीच्या मित्राने तिच्या प्रियकराला दगडाने ठेचले. यामध्ये प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 7) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडाचा मळा, जाधववाडी चिखली येथे घडली.

अब्दुलकमाल शेख असे जखमी प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ हबीब अब्दुला शेख (वय 36, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुलकमाल याची प्रेयसी (वय 34, रा. चिखली) आणि तिचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण (वय 28, रा. पाटीलनगर, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलकमाल याचे आरोपी महिलेशी प्रेमसंबंध होते. ‘तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये’ असा तो तिच्याकडे वारंवार तगादा लावत होता. त्यावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होते. हा विकोपाला गेल्याने तिने तिच्या मित्राला हा प्रकार सांगितला.

प्रेयसी आणि तिच्या मित्राने अब्दुलकमाल याला लाथाबुक्क्यांनी व दगडाने डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हबीब शेख, रमजान अली आणि हिरामण रोकडे यांनी आरोपी प्रेमदास याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘तुम्ही मध्ये आला तर तुम्हाला पण मारून टाकीन’ अशी त्याने धमकी देत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अब्दुलकमाल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी प्रेमदास याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.