धक्कादायक ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

105

सांगली, दि. २० (पीसीबी) – आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्महत्या केली आहे. सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर प्रकार समोर
अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

आत्महत्या का केली?
आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

कुणी केली आत्महत्या?
आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचं नाव वनमोरे असून दोन भावांनी आपलं अख्खं कुटुंब संपवलंय. या आत्महत्येनं खळबळ माजलीय. माणिक वनमोरे आणि पोपर वनमोरे असं आत्महत्या केलेल्या दोघा भावांची नावं आहे. ज्यांचे मृतदेह आढळून आलेत, त्यात या दोघा भावांसह आई, पत्नी आणि मुलांचा समावेशही आहे.