दौंड विधानसभेचे शिलेदार कोण? दादा की आप्पा; चर्चेला उधाण…

0
39

दि. ३० (पीसीबी) केडगाव : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेते सज्ज झाले आहेत. अनेक मात्तबर नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच चित्र दौंड विधानसभा मतदासंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीमधील भाजपचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे दोन नेते विधानसभेत एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. रमेश थोरात हे दौंड तालुक्यातील गावागावात घोंगडी बैठका घेत आगामी निवडणुकीची चाचपणी करीत आहेत. अपक्ष राहायचं की, अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ हातात बांधायचे की तुतारीकडे उमेदवारी मागायची? नेमकं कोणाकडून तिकीट घेऊन उभारायचे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

मागील निवडणुकीत थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रमेश थोरात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी तशी तयारीलाही सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीकडून राहुल कुल यांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राहुल कुल आणि रमेश थोरात लढत पुन्हा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.रमेश थोरात यांनी विधानसभेची आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी, यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. थोरात यांनी आगामी निवडणूक ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवावी, असा समर्थकांचा त्यांच्यावर दबाव वाढत आहे. त्यामुळे रमेश थोरात हे तुतारी कडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे विधानसभेत काम करताना राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या लोकांमध्ये राहुल कुल यांचे नाव घेतले जाते. विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठका देखील सुरू केल्या आहेत. तर येणार्‍या निवडणुकीत राहुल कुल भाजप च्या तिकीटावर हॅट्रिक करणार असल्याचे मत कार्यकर्ते नोंदवत आहेत. त्यामुळे तालुक्यांत याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क बांधले जात आहेत.