दोन महिन्यात होणार बोपखेल पूल खुला; रखडलेल्या १० टक्के कामाला सुरुवात

0
637

बोपखेल, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका टॉवरच्या अडथळ्यामुळे रखडलेल्या बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी उपमहापौर, माजी स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासन आणि जागा मालकांमध्ये योग्य समन्वय घडवून आणला. त्यानंतर जागा मालकांनी काम करण्यास मान्यता दिल्याने दोन दिवसांपासून पुलाचे काम सुरू झाले आहे. पुढील दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल आणि नागरिकांसाठी वापराकरिता पूल खुला होईल असा विश्वास घुले यांनी व्यक्त केला. रखडलेले काम सुरू झाल्याने बोपखेलवासीयांनी समाधान व्यक्त केले.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरींगने (सीएमई) १३ मे २०१५ रोजी बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना नाईलाजास्तव दिघी, विश्रांतवाडीमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका नागरिकांसाठी बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर एक हजार ८६६ मीटर म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्यात येत आहे. पुलाचे काम टी ॲण्ड टी इन्फ्रा कंपनी करीत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंब या कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. बोपखेलच्या बाजूने काम पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाच्या खडकीकडील कामास दोन ऑक्टोबर २०२१ ला परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.

हा पूल ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून हा पूल जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारली आहे. त्यावर १.५ मीटर उंचीचे सुरक्षा कठडे बसविण्यात येत आहेत. नदी पात्र, लष्कराचा रेल्वे मार्ग, वन क्षेत्र, रस्ता व विविध संरक्षण विभागाच्या भूखंडावरून पूल जातो. रस्त्यांची रुंदी आठ मीटर असून दोन लेनचा मार्ग आहे. पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. उच्चदाब वाहक विद्युत तारांच्या टॉवरचे स्थलांतर केल्यानंतरच काम करता येणार होते. त्यासाठी बोपखेलच्या बाजूने एक टॉवर उभारणे आवश्यक आहे. खडकीकडील जागा ताब्यात आली असून, तेथे पाच टॉवर उभारून तारांची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने ते काम रखडले होते.

प्रशासन आणि जागा मालक यांच्यात तोडगा निघत नव्हता. माजी उपमहापौर, माजी स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासन आणि जागा मालकांमध्ये समन्वय घडवून आणला. घुले यांच्या पुढाकाराने महापालिका प्रशासन आणि जागा मालकांची बैठक झाली. जागेचा मोबदला भविष्यात टीडीआर स्वरूपात दिला जाईल. घुले आणि महापालिकेच्या विनंतीवरून जागा मालकांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर दोन दिवसांपासून काम सुरू झाले आहे.

जागेमुळे बोपखेल पुलाचे १० टक्के रखडले होते. जागा मालक आणि महापालिका प्रशासनात समन्वय साधून प्रश्न सोडविला.
बोपखेलवासीयांना नऊ वर्षांपासून १५ किलोमीटरचा वळसा मारावा लागत आहे. वेळ, पैसा वाया जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कामाला गती द्यावी. दोन महिन्यात काम पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे, असे माजी उपमहापौर हिराबाई घुले यांनी सांगितले.

जागेच्या मार्किंगवरून जमीनधारकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. मार्किंग दाखवून जागा मालकांचा संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून काम सुरू झाले आहे. आगामी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल, कार्यकारी अभियंता हेश कावळे यांनी सांगितले.