देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन ‘डीपीआर’ तयार; लवकरच निविदा प्रसिद्ध होणार – श्रीरंग बारणे

37

वाकड, रावेत, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटणार

पिंपरी दि. ५ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्याबाबतच्या कामाची निविदाही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. निविदा प्रसिद्ध होऊन काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 मावळ लोकसभा मतदारसंघातून जात आहे. मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचा डीपीआर तयार असून लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले.

खासदार बारणे म्हणाले, पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतचे काम ‘सुवर्ण चतुष्कोण’ या रस्तेबांधणी प्रकल्पाअंतर्गत हाती घेतले होते. हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे. देहूरोड आणि वाकड पर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान 12 अंडरपास आणि ओव्हरब्रीज आहेत.

त्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्ताचा सुधारीत डीपीआर बनविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले असून सुधारित डीपीआर तयार झाला आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे निविदा प्रसिद्ध करुन काम वेगात पूर्ण करण्यावर माझा भर असणार आहे. काम पूर्ण झाल्यास वाकड, ताथवडे येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचीही लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकडेही नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय राजमार्ग 548 -डी म्हणून घोषित केला होता. एनएचआयएने मार्गाचे काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. पंरतु, जमीन अधिग्रहित झाली नाही. त्यामुळे 3 जुलै 2020 मध्ये या कामाला वाइरल पेंडिंग प्रोजेक्टमध्ये सहभागी केले. त्यामुळे त्याचे काम बंद झाले आहे. चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 54 किलोमीटर लांब राष्ट्रीय राजमार्गाला बोरीपरधी खंडात सहभागी करावे. त्यासाठी निधीची तरतूद करावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर या महामार्गाच्या कामाचीही लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल. महामार्गाचे काम सुरु करण्याचे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले.