दुबई ट्रिपच्या बहाण्याने पाच जणांची २० लाखांची फसवणूक

0
188

लहान मुलांच्या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला ट्रिप असे आमिष दाखवून कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत पाच जणांची २० लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत स्पाईस अप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था भोसरी येथे घडला.

रोहित मनोछा (वय ३८, रा. दिल्ली), मृदुल शर्मा (वय २९, रा. इंदोर, मध्यप्रदेश), संजू नंदा (वय ३०, रा. दिल्ली) आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेनेभोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईस अप इव्हेन्ट अँड कास्टिंग संस्था भोसरी या संस्थेचे पदाधिकारी तसेच मॅनेजर यांनी आपसात संगनमत करून संस्थेच्या नावाखाली लहान मुलांचे कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमात जो जिंकेल त्याला दुबईला जाण्याची संधी मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यासाठी गुंतवणूक म्हणून फिर्यादीकडून एक लाख ३१ हजार रुपये, अजून ओएज खान यांच्याकडून दोन लाख २० हजार, अविनाश विठ्ठलराव शिंदे यांच्याकडून एक लाख ५० हजार, जगजीत सिंग यांच्याकडून आठ लाख रुपये, अनुप्रिता उन्मेष पाटील यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये असे एकूण २० लाख ३९ हजार रुपये घेत फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.