दुचाकीला धक्का देत तरुणाला मारहाण करत खुनी हल्ला

463

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अनोळखी व्यक्तीने त्याच्या दुचाकीने धक्का दिली. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेसहा वाजता देहूफाटा आळंदी येथे घडली.

महेश संजय चौधर (वय 30, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश चौधर आणि त्यांचा मित्र राजकुमार शिरसाट हे दुचाकीवरून आळंदीकडे जात होते. देहूफाटा येथे एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या ताब्यातील दुचाकीने महेश यांच्या दुचाकीला धक्का दिला. हा प्रकार महेश यांना जाणवल्याने त्यांनी धक्का देणाऱ्या व्यक्तीला याबाबत विचारले. त्यावरून अनोळखी व्यक्तीने महेश यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.