दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू; भाजप नेत्याची बोचरी टीका

0
89

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादीत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आधी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगणारे खडसे आता अचानक शरद पवार गटातच आपण आहोत असं सांगत आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू, अशी खोचक आणि बोचरी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

एकनाथ खडसे यांचा दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशा बाबत सांगत आहे तर मग कोणाचा विरोध राहील? खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू, अशी टीकाच गिरीश महाजन यांनी केली आहे.

जिल्ह्यातील रस्ते गलिच्छ असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ग्रामस्थांचा कुठलाही रोष नाही. लिही तांडा या ठिकाणी सरपंचांच्या घरी जाताना गाडी जात नसल्याने कार्यकर्त्याच्या दुचाकीवर गेलो. काही ठिकाणी रस्ते तुंबलेले होते. त्याचं काम करून घेण्यास मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पण त्याचा विपर्यास केला गेला. पावसाळा आहे, गावात कामं सुरू आहेत आणि सर्व कामे मंजूर आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने त्यातून आम्ही गाडी टाकली, एवढाच हा विषय आहे. मात्र विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केला आहे, असं महाजन म्हणाले.