थर्ड आय – अविनाश चिलेकर | अगोदर नदी-नाले बुजवले…आता भोगा कर्माची फळं…

0
367

दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने अर्धेअधिक पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पाण्यात डुंबले होते. मुळा, मुठा, पवना, इंद्रायणीच्या पुराने किनाऱ्यावरच्या वस्त्या, सोसायट्या अक्षरशः तरंगत होत्या. पुणे शहरात खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्याने सिंहगड रस्त्याच्या दुतर्फा असलेला सगळा भाग पुराने वेढला होता. पिंपरी चिंचवडला आणखी विशेष म्हणजे पवना धरणातून पाणी सोडण्यापूर्वीच महापूर आला होता. पवना खोऱ्यात आणि मुळशीतील मुळा नदीच्या खोऱ्यात धो धो पाऊस बरसला आणि धरणे ओसडून वाहण्यापूर्वीच शहरात पाणी घुसले. तब्बल अडिच हजार कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. आता पवना, मुळशी, पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला ही सर्वच धरणे तुडुंब भरलीत. हवामानखात्याने पुढचे तीन दिवस म्हणजे १ ते ३ ऑगस्ट मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. एकाच वेळी पावसाचे पाणी आणि धरणांचे पाणी नदीत आले तर परिस्थिती न भूतो न भविष्य अशी असेल. राज्यकर्ते, प्रशासनाच्या आशिर्वादाने लाखो ट्रक्स् भराव टाकून नद्यांचे पात्र बुजवले. पूररेषा बदलून बांधकाम परवानग्या दिल्यात. जर का २००६-७ प्रमाणे महापूर आलाच तर, नदिच्या किनाऱ्याचे अर्धे शहर पाण्यात असेल. आपत्ती निवारण विभागाचे तीन तेरा वाजतील. लष्कराला पाचारण केले तरीसुध्दा परिस्थिती आटोक्यात येणार नाही. असे काहीच होऊ नये असे मनोमन तीव्र वाटते, पण नद्याचा गळा घोटल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. निसर्ग कोणालाही माफ करत नाही. पाण्याच्या लोंढ्यापुढे कोणाचे काही चालत नाही. पाप झाकताही येणार नाही की, ते क्षम्यसुध्दा नाही.

शहरातील नद्या-नाले आणि छोट्या मोठ्या ओहळांचा २० वर्षांपूर्वीचा उपग्रह नकाशा आणि आजचा नकाशा समोरा समोर ठेवला तर प्रकरण किती गंभीर आहे ते कळेल. पवनेची पूररेषा बदलून २९ मोठे बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्याचे पाप तत्कालिन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. पवनेत पिंपळे गुरवच्या किनाऱ्यावर भराव टाकल्याने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडीत पाणी घुसले. थेरगाव स्मशानाच्या बाजुने हजारो ट्रक राडारोडा पात्रात टाकल्याने चितपावन गणपतीचा किनारा पाण्यात होता. रावेतला तब्बल १००-१५० फुटापर्यंत भराव टाकला म्हणून पुनावळेला धोका निर्माण झाला होता. वाल्हेकरवाडी, भोंडवे चौक, धनेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणे आहेत. मुळा नदित एका बड्या मीडिया मालकाने ५० हजार ट्रकवर माती रिचवली. औंधच्या बाजुने तसेच जुनी सांगवीतही भरावाचा कहर झाला. हरित लवादाक़डे याबाबत तक्रार करण्यात आली म्हणून महापालिकेला नोटीस काढण्यात आली. दापोडी आणि पिंपळे गुरवच्या बाजुने भराव काढण्यासाठी कागदोपत्री सुमारे ३-४ कोटींचा खर्च केला मात्र काम शून्य झाले. खरे तर, महापालिकेचा पर्यावरण विभाग हाच मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याने नद्यांचे सौंदर्य बिघडले आणि अस्तित्वच धोक्यात आले आहे. नदीत भराव टाकू नये म्हणून सुरक्षा पथक नेमल्याचे तसेच सीसी कॅमेरे बसवल्याचे सांगण्यात आले. चार-दोन लोकांवर गुन्हे दाखल केल्याचा देखावा केला, पण आजही राजरोस भराव टाकण्याचे काम सुरूच आहे. शहरातील १४५ मोठे नाले ठिकठिकाणी अर्धेअधिक बुजवलेत, बिल्डिंगसाठी वळवले. प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात तब्बल ४५०० ओहळ कायमचे बुजविण्यात आल्याचा अहवाल आणि नकाशासुध्दा आहे. रहाटणीचा गावतलाव बुजवला म्हणून खासदार-आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे मोठे राजकारण झाले होते. उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. प्रत्यक्षात तलाव सपाट झाला पण प्रकरणाचा निकाल का लागला नाही याचे गूढ कायम आहे. असे शेकडो तलाव आणि विहीरीसुध्दा बुजवल्यात.

इंद्रायणी नदी आठवड्याला फेसाळते पण आमदार म्हणतात नमामी इंद्रायणी प्रकल्प सुरू आहेत. शहरातील सांडपाण्याचे शुध्दीकरणासाठी असलेले २६ एसटीपी सुरू न ठेवता ४० कोटी बिलाची वसुली होते म्हणून नदीचे महागटार झाले. सर्व कामांना आशिर्वाद भाजप आमदारांचा आहे. आता ४५०० कोटींचा तीन नद्यांसाठी सुधार प्रकल्प राबविण्यात येतो आहे. २०० कोटींचे रोखे काढण्यात आलेत. पुणे शहरात हा नदीसुधार प्रकल्पच पूराचे कारण ठरला आहे. पिंपरी चिंचवड शहरात त्यावर फेरविचार झाला पाहिजे. पूररेषा नियंत्रण कायदा लागू केला नाही तर निधी देणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. महापालिकेची आजवरची अंदाधुंदी पाहिली तर केंद्र सरकारचा पहिला वरवंटा पिंपरी चिंचवड प्रशासनावर फिरेल. निसर्गावर अन्याय, अत्याचार, अतिक्रमण केले तर एक दिवस तो कोपणार हे ठरलेले आहे. आता ते दिवस दूर नाहीत. आता तरी शहाणपण येईल, अशी अपेक्षा.