त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सोडवा; धनंजय भालेकर यांची मागणी

0
201

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) : त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील वाहतुक कोंडीच्या समस्येने वाहनचालक तसेच नागरिक हैराण झाले असून हि वाहतुक कोंडीची समस्या लवकरात-लवकर सोडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर (दि.१३ रोजी) पोलीस प्रशासनाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांची बैठक पार पडली. यासंदर्भात शिक्षण मंडळाचे सभापती धनंजय भालेकर यांनी पाठपुरावा केला होता.

सविस्तर वृत्त असे की, त्रिवेणीनगर- तळवडे रस्ता विविध कारणांमुळे वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात सापडला आहे. या मार्गावर होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिक त्रस्त होत आहेत. पोलीस प्रशासन,वाहतूक पोलिस तसेच मनपा प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्यावरील वाहतुक कोंडी संदर्भात वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ.अमरनाथ वाघमोडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश नलावडे, गौरव शिंदे (कनिष्ठ अभियंता), राजु कुंभार (स्थापत्य), श्री.इंगळे, श्री.गवळी ( नगररचना) यांच्या समवेत
स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिका समवेत बैठक पार पाडली.यावेळी वाहतुक कोंडी कमी कशी होईल? त्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना करता येतील,या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय भालेकर यांनी आवश्यकतेनुसार वाहतूक पोलीस व ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली.

यावेळी मा.नगरसेवक शांताराम भालेकर, मा.शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, ज्योतिबा नगर इंडस्ट्रीज इंजिनचे अध्यक्ष ठिकाराम शर्मा, इतर उद्योजक महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी, स्थापत्य विभागाचे अधिकारी,गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी – कार्यकर्ते,गणेश नगर येथील कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.