महिलेचा खून करून मृतदेह खंबाटकी घाटात फेकला
महिलेच्या तीन वर्षीय मुलाला सोडले आळंदीत
वाकड, दि. 30 (पीसीबी) : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणा-या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिले. महिलेच्या तीन वर्षीय मुलाला आळंदी येथे सोडून देत प्रियकराने स्वतः महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर वाकड पोलिसांनी तक्रार देणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे. या गुन्ह्यात प्रियकराच्या पत्नी आणि मेहुण्याचा देखील सहभाग आढळून आला आहे. वाकड पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.
जयश्री विनय मोरे (वय 27, रा. मारूंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दिनेश पोपट ठोंबरे (वय 32, रा. मु बहुर, पो. करूंज, ता. मावळ) याला सुरुवातीला अटक केली होती. त्यानंतर त्याची पत्नी पल्लवी दिनेश ठोंबरे (वय 29, रा. बऊर, ता. मावळ) आणि मेहुणा अविनाश हनुमंत टिळे (वय 24, रा. शिवणे, ता. मावळ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबर रोजी प्रेयसी जयश्री विनय मोरे जिंजर हॉटेल, भमकर चौक, वाकड येथून काही न सांगता निघून गेली ती परत आली नसल्याची तक्रार दिनेश ठोंबरे याने वाकड पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान पोलिसांना जयश्री मोरे यांचा मृतदेह खंबाटकी घाट (खंडाळा) जि. सातारा येथे आढळून आला. याबाबत सातारा पोलिसांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे तिची हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दिनेश ठोंबरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
दिनेश आणि जयश्री हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान दिनेश याला जयश्री हीचे दुसऱ्या पुरुषा बरोबर सबंध असल्याचा संशय होता. तसेच तिने दिनेश यास पैशाची मागणी केल्याने दिनेश याने 24 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास जिंजर हॉटेल सर्व्हिस रोड, भुमकर चौक परिसरात तिच्याशी भांडणे केली. त्यावेळी त्याने कारमधील हातोडी जयश्री मोरे हिच्या डोक्यात मारुन तिचा खून केला. तिचे प्रेत सातारा हायवेने कारमधून नेऊन खंबाटकी घाट (खंडाळा) जि सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिले. यासाठी दिनेश याला त्याची पत्नी आणि मेहुणा अविनाश या दोघांनी साथ दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जयश्री मोरे हिला तीन वर्षांचा मुलगा आहे. दिनेश याने मुलाला आळंदी येथे सोडून दिले. त्यानंतर स्वतः वाकड पोलीस ठाण्यात जाऊन जयश्री मोरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. वाकड पोलीस तपास करीत आहेत.