त्यांनी गावबंदी करायची, लोकांची घरे जाळायची, पोलिसांना जखमी करायचे, आम्ही गप्प बसावे का

0
193

महाराष्ट्र,दि.२०(पीसीबी) – एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली सर्व शक्ती पणाला लावत असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून ओबीसींमधून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी खुले आव्हान दिले आहे. तसंच, त्यांना पक्षाचा पाठिंबा आहे की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.

मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊऩ आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या विरोधात राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आक्रमकपणे उभे राहिले आहेत. आपली ही आक्रमकता सरकारलाही आव्हान देणारी नाही का, असे भुजबळ यांना विचारले असता, सरकारने सरकारसारखे वागले पाहिजे. कायदा वगैरे काही आहे की नाही? आमच्या सभा रात्री १० वाजता बंद केल्या जातात, त्यांना रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी, हे बरोबर नाही, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.

“मी आधी आक्रमक झालो नाही; परंतु त्यांनी गावबंदी करायची, लोकांची घरे जाळायची, पोलिसांना जखमी करायचे, आम्ही गप्प बसावे का, असा सवाल त्यांनी केला. माझी भूमिका मी घेऊन निघालो आहे, पक्षाचा मला पाठिंबा आहे की नाही याचा मी विचार करीत नाही”, असंही छगन भुजबळ म्हणाले.