…त्यांना कॅबिनेट आणि आम्हाला राज्यमंत्रीपद हा दुजाभाव – खासदार श्रीरंग बारणे यांची टीका

0
274

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला अवघं एकच मंत्रिपद देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला फक्त राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड असंतोष पसरला आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या बाबतची जाहीर नाराजीही बोलून दाखवली आहे. एक दोन खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जातं अन् आम्हाला राज्यमंत्रीपद दिलं जातं हा दुजाभाव आहे. ही न्यायिक भूमिका नाही, अशी नाराजी व्यक्त करतानाच उदयनराजे यांना तरी भाजपने मंत्री करायला हवं होतं. शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखायला हवा होता, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही खदखद व्यक्त केली आहे. भाजपने कुणाला मंत्रीपद द्यावं आणि कुणाला नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळायला हवा होता. उदयनराजे भोसले तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. ते सीनिअर आहेत. गादीला मान मिळाला असता तर अभिमान वाटला असता. आम्हालाही आनंद झाला असता, असं श्रीरंग बारणे म्हणाले.
राज्यमंत्रीपद देऊन शिंदे गटाच्या तोंडाला पानं पुसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागा लढवल्या. त्यांचे 9 खासदार निवडून आले. आम्ही 15 जागा लढवून सात खासदार निवडून आणले. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. शिवाय शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल ही आमची अपेक्षा होती. आमचा पक्ष महायुतीतील दोन नंबरचा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे उचित सन्मान व्हायला हवा होता, असं श्रीरंग बारणे म्हणाले.

ज्या पक्षाचा एक खासदार आणि दोन खासदार आहेत. त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांचे दोन खासदार आहेत. त्यांना एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं. जीतनराम मांझी एकटे निवडून आले आहेत. त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद दिलं. चिराग पासवान यांचे पाच खासदार आले. त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद दिलं. आमचे सात खासदार आहेत. तरीही आम्हाला राज्यमंत्रीपद देण्यात आलं. आमच्यासोबत हा दुजाभाव करण्यात आला आहे, अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली.

अजितदादा गटाला एकही मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजितदादांना न्याय मिळायला हवा होता. या राजकीय घडामोडीत अजितदादांनी कुटुंबाचा वाईटपणा आणि रोष घेतला आहे. त्यांनी भाजपसोबत जाण्याची धाडसी भूमिका घेतली. त्यामुळे एनडीएचे घटक म्हणून त्यांना न्याय मिळायला हवा होता, असंही ते म्हणाले.