…तोपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना कोणताही धोका नाही

302

 पिंपरी दि. २५ (पीसीबी)- जोपर्यंत काँग्रेस पक्ष तळमळीने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तोपर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोणताही धोका होणार नसल्याचे मत पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व पुरंदर- सासवड चे आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोकुळदास शहा यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आमदार संजय जगताप हे इंदापूर येथे आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाने लक्ष केला असून देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू आहे, केंद्रीय अर्थमंत्री यांचा इंदापूर तालुक्यातील दौरा संपला असून त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. या निमित्ताने संजय जगताप यांना विचारले असता याचा काहीही परिणाम होणार नसून बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष हा सक्षम असून पक्षाचे दोन आमदार या मतदार संघात आहेत, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही बदल अपेक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षातही काही आमदार नाराज असून ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असल्याबाबत त्यांना विचारले असता जगताप म्हणाले की यापूर्वी काँग्रेस पक्षात कधीही बंड झाले नाहीत, जे पक्ष सोडून गेले ते इतर पक्षातून आले व सत्ता भोगून निघून गेले, परंतु काँग्रेस पक्षामध्ये विश्वासाने काम करणारे कार्यकर्ते मात्र पक्षाशी ठाम राहिले. राज्यसभा निवडणुकीत सर्व आमदारांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान दिले, विधान परिषद निवडणुकीत काही झाले असेल परंतु कोणीही पक्ष सोडणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर शहराध्यक्ष चमनभाई बागवान, उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, सचिव महादेव लोंढे, सरचिटणीस श्रीनिवास शेळके, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, स्वप्निल चिंचकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.