तोट्यातील ३३ कंपन्यांकडून भाजपला ४३४ कोटीची देणगी

0
98

दि 4 एप्रिल (पीसीबी ) – नुकत्याच देणगीदारांच्या यादीतील १७ अनलिस्टेड कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी मागील चार वर्षांत झालेल्या एकूण नफ्यापेक्षा जास्त देणगी राजकीय पक्षांना दिल्याचे स्पष्ट झाले होते. अशात आता तोट्यात असलेल्या ३३ कंपन्यांनी एकूण ५८२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे राजकीय पक्षांना दिल्याचे पुढे आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी ७५ टक्के रोखे एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, द हिंदू आणि एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या संशोधनात विविध राजकीय पक्षांना निवडणूक रोखे देणाऱ्या ४५ कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नावर संशय उपस्थित करण्यात आला आहे. यापैकी ३३ कंपन्यांनी एकूण ५७६.२ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे विविध राजकीय पक्षांना दिले असून एकट्या भाजपाला ४३४.२ कोटी रुपयांचे रोखे मिळाले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांचा २०१६-१७ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षातला एकूण तोटा एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

याशिवाय सहा कंपन्या अशा आहेत, ज्यांना २०१६-१७ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात चांगला नफा झाला आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या नफ्यापेक्षा जास्त किमतीचे रोखे राजकीय पक्षांना दिले आहेत. या कंपन्यांनी एकूण ६४६ कोटी रुपयांचे रोखे विविध राजकीय पक्षाला दान केले आहेत. यापैकी भाजपाला ९३ टक्के, म्हणजेच ६०१ कोटी रुपयांचे रोखे मिळाले आहेत.

याबरोबरच तीन कंपन्या अशा आहेत, ज्यांनी २०१६-१७ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १९३.८ कोटी रुपयांचे रोखे विविध राजकीय पक्षांना दान केले आहेत. यापैकी २८.३ कोटी रुपयांचे रोखे भाजपाला, ९१.६ कोटी रुपयांचे रोखे काँग्रेसला, ४५.९ कोटी रुपयांचे रोखे तृणमूल काँग्रेसला, प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे रोखे बीजेडी आणि बीआरएसला आणि सात कोटी रुपयांचे रोखे आम आदमी पक्षाला मिळाले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांनी २०१६-१७ ते २०२२-२३ या आर्थिक वर्षात बऱ्यापैकी नफा कमावला आहे. मात्र, त्यांनी कोणताही कर भरला नाही. या कंपन्या करचुकवेगिरी प्रकरणात अडकल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.