तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के…! अनेक घरांचे मोठे नुकसान, त्सुनामीचा अलर्ट

313

विदेश,दि.१८(पीसीबी) – काल आणि आज तैवानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला. पूर्व तैवानच्या युजिंग भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे हुआलिन परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान, जापानला त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत देशात लहान-मोठे 100 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी दुपारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, रस्त्यांना मोठे तडे गेले, ट्रेन रुळावरच पलटी झाली. भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून, जीव वाचवण्यासाठी अनेकजण अजूनही आपल्या घराबाहेर आले आहेत.

इतकी मोठी घटना घडली, तरीदेखील सुदैवाने यात अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग परिसरात होता. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान या भूकंपामुळे झाले आहे. रस्त्यांना तडे गेले आहेत, एक मोठा पुलही कोसळला आहे. तैवान रेल्वे प्रशासनाने सांगितले की, हुआलियन आणि तैतुंगला जोडणारी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

ताैवान रिंग ऑफ फायर भागात आहे. ही अशी जागा असते, जिथे सर्वाधिक भूकंप किंवा त्सुनामी, ज्वालामुखी विस्फोट होऊ शकतात. तैयवान दोन टेक्टोनिक प्लेटांच्या अगदी जवळ वसलेला देश आहे. या प्लेट्समध्ये थोडीही हालचाल झाली की, तैवानमध्ये भूकंप किंवा त्सुनामीचा धोका निर्माण होतो. यापूर्वी 2016 मध्ये आलेल्या भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, 1999 मध्ये आलेल्या 7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2000 लोक मृत्यूमुखी पडले होते.