वाकड, दि. 08 (पीसीबी) : अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहन चालकाला कोयता व लोखंडी रॉडने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.
विशाल नथू गायकवाड (वय 30, रा. रहटणी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर पांचाळ (वय 20), करण उर्फ मुन्ना गजानन चोपवाड (वय 24, दोघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे त्यांच्या दुकानासमोर टेम्पो पार्क करून टेम्पोतून उतरून त्यांच्या मित्रांशी बोलत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी ‘आमच्या अंगावर चिखल का उडवला’ असे विचारून गायकवाड यांचे काहीही न ऐकता ‘तुला लय माज आला आहे का. तुला आज संपवूनच टाकतो’ असे म्हणत कोयत्याने वार केले. तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी गायकवाड हे जखमी झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.