तीन महिन्यात 500 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवत वृद्ध महिलेची 24 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 26 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत सांगवी येथे घडला.
याप्रकरणी 65 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी राजीव अंबानी आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला अनोळखी व्यक्तीने फोन करून तो राजीव अंबानी बोलत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर इतर अनोळखी व्यक्तींनी फोन करत कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत त्यांना शेअर खरेदी करून तीन महिन्यात 500 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यापोटी आरोपींनी फिर्यादी महिलेकडून 24 लाख 80 हजार रुपये घेत त्यांना कोणताही परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.