तळेगाव-चाकण मार्गावर हिट अँड रन; महिलेला चिरडून वाहन चालक पळाला

0
20

तळेगाव,
तळेगाव-चाकण मार्गावर अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. महिलेला चिरडून वाहन चालक वाहनासह पळून गेला. ही घटना मंगळवारी (दि. 9) पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेच्या समोर घडली.

आशा नंदकुमार शिवले (वय 59) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयूर आनंद दाभाडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आत्या आशा शिवले या पुणे येथील के ई एम हॉस्पिटल मध्ये काम करत होत्या. मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास त्या कामावर जाण्यासाठी घरातून निघाल्या. तळेगाव-चाकण रोडवर संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेसमोर आल्यानंतर चाकणकडून तळेगावकडे आलेल्या भरधाव वाहनाने शिवले यांना पाठीमागून धडक दिली.

शिवले यांच्या अंगावरून वाहन चालवून त्यांना चिरडले. त्यानंतर अपघाताची माहिती न देता तसेच उपचारासाठी दाखल न करता वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या शिवले यांचा यात मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.