…तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन”, उद्धव ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया!

44

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत आहेत. मला समोर येऊन सांगा की तुम्ही आम्हाला नको आहे, मी लगेच मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्री पदाची आपल्याला लालचा नाही, कुठली मजबुरीही नाही, असे सांगतानाच शिवसैनिकाने सांगितले तर शिवसेना प्रमुखपद सुध्दा सोडायला केव्हाही तयार आहे, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आले होते. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी पद सोडायला तयार आहे –
ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्यांना माझ्याकडे उत्तर आहे. मी शिवसेनेचे नेतृत्व करायला लायक नाही. मी दोन्ही पद सोडायला तयार आहे. पण त्यानंतर जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मना आनंद आहे, दुसऱ्या पक्षाचा होणार असेल तर तसं नको. समोर या आणि सांगा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो –
शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नको. मी आज राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवतो. जे गायब आहेत त्यांनी माझे पत्र घ्यावे. मी पुन्हा एकदा सांगतो हा अगदिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी नाही. मी आव्हानाला सामोरं जाणारा माणूस आहे, पाठ दाखवणारा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस –
मला कशाचाही अनुभव नसताना मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम करणारा माणूस आहे. त्याच जिद्दीने मी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द पुरा करणारच, असे मुख्यमंत्री म्हणाले. २५-३० वर्षे ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात लढलो याची आठवण करून देत केवळ शरद पवार यांनी आग्रह केल्याने मी मुख्यमंत्रीपदासाठी तयार झालो होतो असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.