…तर ते आमदार अपात्र ठरणार

79

पुणे, दि, ८ (पीसीबी) : राज्यातील सत्तांतर आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींबाबत अद्यापही पुढे काय? या प्रश्नाची उत्सुकता शमलेली नाही. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. त्यामुळे याबाबत घटनाचक्र पुन्हा उलटे फिरू शकते. नरहरी झिरवाळ हे पुन्हा उपसभापती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे मत घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात नुकतेच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने परिसंवाद आयोजित केले होते. त्यात घटनातज्ज्ञ आणि कायद्याच्या अभ्यासकांनी परिसंवादात वरील शक्यता व्यक्त केली.

पक्षांतर बंदी कायद्यातील अनुच्छेद २ आणि ४ नुसार १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय ठरणार आहे. आमदार अपात्र ठरवले जाणारच नाहीत, असे कुणीही खात्रीशीर सांगू शकणार नाही. त्यामुळे घटनाक्रम उलटा देखील फिरू शकतो.यामध्ये विधानसभेचे नरहरी झिरवळ हे पुन्हा हंगामी सभापती होऊन आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सात ते नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या कोर्टात हा चेंडू टाकला जाऊ शकतो.

आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेचप्रसंग कधीही निर्माण झालेला नाही. त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अशी शक्यता घटनातज्ज्ञ आणि कायद्याच्या अभ्यासकांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकरराव आव्हाड आणि घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट, अॅड. असीम सरोदे परिसंवादात सहभागी झाले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते.