तरुणावर ब्लेडने वार करत बेदम मारहाण

0
428

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – काम संपवून मध्यरात्री घरी आलेल्या तरुणाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. 21) रात्री साडेबारा वाजता लिंकरोड पत्राशेड येथे म्हसोबा सोसायटीच्या पार्किंग मध्ये घडली.

करण शशिकांत सरवदे (वय 24, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाखन मिशराज खैरानिया (वय 40, रा. लिंकरोड, पत्राशेड, चिंचवड) आणि त्याचा भाचा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पाण्याच्या टाक्या साफ करण्याचे काम करतात. रात्रीच्या वेळी ते फ्लेक्स बसवण्याचे देखील काम करतात. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता ते फ्लेक्स लावण्याचे काम संपवून घरी आले. त्यावेळी आरोपी लाखन हा त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पेट्रोल चोरी वरून शिवीगाळ करीत होता.

फिर्यादींनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो शिवीगाळ करत राहिला. काही वेळाने फिर्यादी यांच्या पत्नीने आरोपीला ‘शिव्या का देतो’, असे विचारले असता आरोपीने शिवीगाळ करणे सुरूच ठेवले. हा प्रकार पाहून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी व आई घरी जात होते. त्यावेळी लाखन याच्या भाच्याने फिर्यादीच्या पाठीवर ब्लेडसारख्या शस्त्राने वार केले. लाखन याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.