तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न दोन राऊंड फायर

0
251

दिघी ,दि. १९ (पीसीबी) -दुचाकीवरून घरी जाणाऱ्या तरुणावर गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. १८) मध्यरात्री साडेबारा वाजता चोविसावाडी चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

सिद्धेश सीताराम गोवेकर (वय २८, रा. वडमुखवाडी, चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरिओम पांचाळ (वय २०, रा. वडगाव रोड, आळंदी देवाची) आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोवेकर हे त्यांच्या दुचाकीवरून आळंदी येथून वडमुखवाडी येथे घरी जात होते. ते काटे कॉलनी बस स्टॉप जवळ आले असता जुन्या भांडणाच्या कारणावरून हरिओम आणि त्याच्या साथीदाराने त्यांना अडवले. गोवेकर यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने गोवेकर या हल्ल्यात बचावले.  पोलीस तपास करीत आहेत.