तब्बल 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाखांची फसवणूक

0
453

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – भागीदारीत बांधण्यात आलेल्या प्रकल्पातील 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 24 मे रोजी सेक्टर 11, भोसरी येथे घडला.

प्रदीप पोपटलाल कर्नावट (वय 53, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत मणिलाल संघवी (वय 55), संदेश मिश्रीलाल चोपडा (वय 54), प्रमोद भाईचंद रायसोनी (तिघे रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी पी 3 डेव्हलपर्स भागीदारी संस्थेच्या वतीने बांधण्यात आलेल्या प्रसन्न गोल्डफिल्ड या प्रकल्पातील 62 दुकाने त्यांच्या स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावे केली. फिर्यादी यांनी दिनेश पारसकुमार मेहता, संजय मुल्तानचांद कासवा, संजय रमणभाई पटेल यांना आगाऊ रक्कम घेऊन काही दुकानांची विक्री केली होती.

आरोपींनी 11 वेगवेगळ्या दस्ताद्वारे करारनामा करून 62 दुकाने त्यांच्या संस्थेच्या नावावर केली. त्यात फिर्यादी यांनी विक्री केलेल्या 16 दुकानांचा समावेश आहे. आरोपींना अधिकार नसताना 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा अपहार करून 62 दुकाने, ऑफिसेस स्वताच्या वैयक्तिक फायद्यासाठी स्पेक्ट्रम रियाल्टी भागीदारी संस्थेच्या नावावर करुंग हेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.