तब्बल 400 रिक्षा, 150 सीसीटीव्ही तपासून भोसरी पोलिसांनी दोन चोरट्यांना पकडले

0
280

भोसरी, दि. ३१ (पीसीबी)- भोसरी पोलिसांनी तब्बल 400 रिक्षा आणि 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून दोन चोरट्यांना अटक केली आहे. हे चोरटे प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून त्यांना लुटत असत. दिलीप शिवराम गायकवाड (रा. शिवाजी चौक, एसपी ऑफीस मागे, लातूर), संदीप साहेबराव पवार (रा. महापुर, लातुर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रात्रीच्या वेळी एका प्रवाशाला रिक्षात बसवून एमआयडीसी, भोसरी येथे नेले. चाकुचा धाक दाखवुन त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि बॅग काढून प्रवाशाला मारहाण केली. त्यानंतर अंधारात सोडून दिल्या बाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी यांनी अर्धवट पाहिलेला रिक्षाचा नंबर पोलिसांना दिला.

त्यावरून भोसरी पोलिसांनी माहिती घेतली. गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षा सारख्या दिसणाऱ्या सुमारे 400 रिक्षा पोलिसांनी तपासल्या. तसेच, तब्बल 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र, तरी देखील पोलिसांच्या हाती ही ठोस पुरावा लागत नव्हता. दरम्यान, तांत्रीक तपासात आरोपी दिलीप गायकवाड याचे नाव निष्पन्न झाले. मात्र, फिरस्ता असल्याने त्याला शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. परिसरात चौकशी केल्यानंतर गायकवाड वाकड येथे चालक म्हणुन काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे फिर्यादी यांच्या मोबाईलसह इतर दोन मोबाईल मिळुन आले. गायकवाड याने साथीदार संदीप पवार आणि एकाच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी गायकवाड याला म्हाळुंगे येथून अटक केली. तर, त्यांचा आणखी एक साथीदार फरार आहे.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत आहेत. त्यांच्यावर लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल मिळून आले आहेत. भोसरी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, सहायक पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिभा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, भाग्यश्री जमदाडे, सुषमा पाटील यांच्या पथकाने केली आहे.